आयुर्वेद कायाकल्प- रसायन - वाजीकरण
चरकाचार्यांनी चार हजार वर्षांपूर्वी वातावरणात होणारे बदल व प्रदूषण याबद्दल लिहिले आहे. खरंतर प्रदूषणाला तेव्हा पासूनच सुरुवात झाली आहे. चरकाचार्यांनी मनुष्याचे आयुष्य शंभर वर्षाचे दिलेले आहे. हा आकडा त्यांनी एकशे पंचवीस वर्ष जगणारी माणसे व ऐंशी नव्वद वर्ष जगणारी माणसे यांच्या सरासरीतून अदमासे सांगितल्याची म्हणतात. ते म्हणतात माणसाचे शंभर वर्षाचे आयुष्य हे स्वस्थ (रोग रहित) आयुष्य आहे. औषधांवर अवलंबून नाही. ते म्हणतात यापुढे माणसाचे आयुष्य शंभर वर्षास एक वर्ष या प्रमाणात कमी होत जाणार आहे. या हिशोबाने आपले आयुष्य आजमितीस साठ झाले. नुकत्याच झालेल्या खानेसुमारी चा आकडा जवळपास तोच आहे. कदाचित योगायोग असेल. त्यात औषधी खाऊन जगणारे किती व न खाणारे किती याचा निश्चित आकडा उपलब्ध नाही. शरीर हळूहळू घटत जाते म्हणून तर त्याला शरीर म्हटले आहे.सध्या अनेकांचे केस 15- 16 व्या वर्षी पिकू लागले आहेत. मुलींच्या मासिक पाळ्या दहाव्या वर्षीच येऊ लागल्या आहेत. खरतर ती वार्धक्य लवकर येण्याची लक्षणे आहेत. अशाच वेळी अशा औषधांची आवश्यकता लागते.
पिंपळी हे रसायन आहे. पिंपळीमध्ये गॅमा ग्लोब्युलिन निर्माण करण्याची किमया आहे असे म्हटले जाते. ही ती प्रतिकारशक्ती वाढवून रसायन ठरते. तेच आवळ्याचे, तेच भुई आवळीचे , तेच ब्राह्मी चे. यापैकी काय वापरायचे व केव्हा वापरायचं ते वैद्याने ठरवायचे आहे. रसायनात नवीन दात येतात वगैरे गोष्टी अतिशयोक्तीतीने आल्या आहेत. हे वैद्याने तारतम्याने घ्यावयाचे आहे. आयुर्वेदात काही औषधांच्या पुढे येते की हे औषध सर्व रोगांचा नाश करते. येथेही रोगांचा विचार तारतम्याने घ्यावयाचा आहे.
वाजीकरण चिकित्सा ही राजे-महाराजे सरदार यांच्यासारख्या लोकांसाठी असावी अशी दाट शंका आहे. जनुकांबद्दल मला स्वतःला फारशी माहिती नाही .पण मुले मुकी ,बहिरी . प्रमेही जन्माला येतात व त्याचे उत्तरदायित्व त्यांच्या आई-वडिलांकडे जाते. त्यांच्यामध्ये असलेल्या बीजे दोषांमुळे ते घडते असे आयुर्वेद मानते आणि त्यासाठी शुक्र शोधन ,शुक्र दोषहर अशी द्रव्ये सांगितली आहे .ती कशी काम करतात हा संशोधनाचा विषय होऊ शकेल.
केवळ आयुर्वेदिक औषधांचे संशोधन म्हणजे आयुर्वेदाचे संशोधन नाही. एखादे ॲक्टिव्ह प्रिन्सिपल सापडले, वेगळे करता आले तर एका बाजूला आयुर्वेदाचे संशोधन व दुसऱ्या बाजूला पैसाच पैसा पेटंट स्वरूपात. मी गेली 46 वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. आयुर्वेद कालबाहय नक्कीच नाही .गेल्या चार हजार वर्षात कालानुरूप व प्रदूषणामुळे मानव व वनस्पती यांच्या बदल घडणे अपेक्षितच आहे. खाद्यपदार्थांचे स्वरूप बदलले आहे. वैशाखी मुग, ज्वाला मिरची, बिनबियांची द्राक्षे असे नवे नवे वाण बाजारात येऊ लागले आहे. सीजनल फळे , भाज्या असे स्वरूप राहिलेले नाही. त्याचे गुणधर्म ठरविणे आहार संकल्पनेतून आवश्यक आहे. आयुर्वेदाचे तत्वज्ञान व औषधांच्या गुणांचे रीव्हेरिफिकेशन आवश्यक आहे. यासाठी हवे सरकारचे पाठबळ, भरपूर आयुर्वेदाचे दवाखाने व रुग्णालये, तज्ञ व जिद्द बाळगणारा वैद्य वर्ग आणि आमच्या राजानेही चीनचे अनुकरण करून म्हटलं पाहिजे की "आयुर्वेद हे भारताचे वैद्यक शास्त्र आहे" .
